संजीवनी अकॅडमीमध्ये ‘एरोबे स्किल लॅब’चे उद्घाटन

संजीवनी अकॅडमीमध्ये ‘एरोबे स्किल लॅब’चे उद्घाटन
एरोमॉडेलिंग, रोबोटिक्स आणि स्टेम शिक्षणातून ग्रामीण विध्यार्थ्यांच्या कौशल्य विकासाला चालना
कोपरगावः ग्रामीण विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाधारित शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने संजीवनी अकॅडमी येथे अत्याधुनिक ‘एरोबे स्किल लॅब’चे उद्घाटन करण्यात आले. या लॅबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना एरोमॉडेलिंग, रोबोटिक्स तसेच स्टेम (सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरींग आणि गणित) शिक्षणाचे प्रत्यक्ष अनुभवाधारित प्रशिक्षण मिळणार आहे. संजीवनी विद्यापीठाचे अध्यक्ष श्री अमित कोल्हे यांच्या दूरदृष्टीतून साकारलेला व संचालिका डॉ. मनालीताई कोल्हे यांच्या प्रयत्नातुन हा उपक्रम विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, सर्जनशीलता आणि संशोधनवृत्ती विकसित करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. संजीवनीचे अध्यक्ष श्री नितीनदादा कोल्हे यांनी या उपक्रमाचे स्वागत करून कौतुक केले.
‘एरोबे स्कील लॅब’ ही अनुभवाधारित आणि कौशल्याधिष्ठित शिक्षणाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले आहे. प्रत्यक्ष कृती, प्रात्यक्षिके आणि प्रकल्पाधारित शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांतील ज्ञान मिळविण्याची संधी उपलब्ध होणार आहे.पुस्तकी ज्ञान आणि त्याचा प्रत्यक्ष उपयोग यांमधील दरी कमी करण्याच्या उद्देशाने या लॅबची रचना करण्यात आली आहे. येथे विद्यार्थी वैज्ञानिक संकल्पना समजून घेणे, विविध मॉडेल्स तयार करणे, नवनवीन प्रयोग करणे आणि कल्पक उपाय शोधणे अशा उपक्रमांमध्ये सहभागी होऊ शकतील. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचार, सर्जनशीलता, सांघिक कार्य आणि समस्या सोडविण्याची क्षमता विकसित होण्यास मदत होणार आहे.राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या दृष्टिकोनाशी सुसंगत असलेल्या या उपक्रमाचा उद्देश शिक्षण अधिक रंजक, परस्परसंवादी आणि प्रत्यक्ष उपयोगावर आधारित बनविणे हा आहे. तसेच उदयोन्मुख तंत्रज्ञान आणि भविष्यातील करिअरच्या विविध संधींशी विद्यार्थ्यांची ओळख करून देण्यावरही भर देण्यात येणार आहे.या उपक्रमाच्या माध्यमातून संजीवनी अकॅडमी आणि एरोबे यांच्या संयुक्त प्रयत्नांतून विद्यार्थ्यांना ज्ञान, प्रत्यक्ष अनुभव आणि भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आवश्यक कौशल्ये प्राप्त होतील. तंत्रज्ञानाधारित जगात आत्मविश्वासाने वाटचाल करण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम बनविण्याच्या दृष्टीने ही लॅब महत्त्वपूर्ण ठरणार आहे.‘एरोबे लॅब’ ही केवळ शिक्षणाची जागा नसून, विद्यार्थ्यांच्या जिज्ञासेला सर्जनशीलतेची जोड देणारे आणि त्यांच्या कल्पनांना भरारी घेण्यासाठी प्रेरणा देणारे व्यासपीठ आहे.
या प्रसंगी संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजचे माजी विद्यार्थी व उद्योजक युवराज वडजे यांनी लॅबला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या उपक्रमांचे कौतुक केले. प्रत्यक्ष प्रयोगांतून शिकण्याची आणि स्वतःच्या कल्पना साकारण्याची संधी अशा उपक्रमांमुळे मिळते, असे त्यांनी नमूद केले. अपयशाची भीती न बाळगता त्यातून शिकणे आणि सातत्याने प्रयत्न करणे महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.
संजीवनी अकॅडमीच्या माजी विद्यार्थिनी अदिती फलटणकर यांनीही लॅबला भेट दिली. शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन, विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी घेतले जाणारे परिश्रम आणि सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणारे उपक्रम यांविषयी त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
डॉ. मनालीताई कोल्हे, प्रमुख पाहुणे युवराज वडजे व अदिती फलटणकर, डॉ. आर. एस. एन. शेंडे, प्राचार्या सुधा सुब्रमणियन, मुख्याध्यापिका माला मोरे, एरोबेचे प्रादेशिक व्यवस्थापक अश्वनी शुक्ला आणि संगणक विभागप्रमुख आदित्य गायकवाड हे या प्रयोगशाळेत प्रकल्प तयार करून त्यांचे सादरीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांसमवेत उपस्थित होते.






