Breaking
ब्रेकिंग

रग्बीच्या रणांगणात समताचा डंका! राज्यस्तरीय स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई

0 0 5 8 8 1

रग्बीच्या रणांगणात समताचा डंका! राज्यस्तरीय स्पर्धेत रौप्यपदकाची कमाई

कोपरगाव : जिद्द, चिकाटी आणि संघभावनेच्या जोरावर समता इंटरनॅशनल स्कूलच्या १७ वर्षांखालील मुलांच्या रग्बी संघाने राज्यस्तरीय स्पर्धेत रौप्यपदक पटकावले. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथील एस.व्ही.जे.सी.टी. स्पोर्ट्स अकॅडमी, डेरवण येथे झालेल्या या स्पर्धेत समताच्या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत अंतिम फेरीपर्यंत मजल मारली आणि शाळेच्या क्रीडा क्षेत्रातील यशात आणखी एक मानाचा तुरा रोवला.

स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात समताच्या संघाने मुंबईच्या संघावर १८-० असा एकतर्फी विजय मिळवला. प्रतिस्पर्धी संघाला एकही गुण मिळवू न देता मिळवलेल्या या विजयातून समताच्या खेळाडूंचे वर्चस्व स्पष्ट झाले. त्यानंतर नाशिकच्या संघाला १२-५ असे पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात कोल्हापूरच्या संघाविरुद्ध खेळाडूंनी जोरदार लढत दिली. मात्र, विजेतेपदाने हुलकावणी दिल्याने संघाला द्वितीय स्थानावर समाधान मानावे लागले. आक्रमक खेळ, चपळाई, भक्कम बचाव आणि सांघिक समन्वयाच्या बळावर समताच्या खेळाडूंनी राज्यस्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध केली.

या यशाबद्दल संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त स्वाती कोयटे यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक गुणवत्तेसोबतच क्रीडाक्षेत्रातील प्रावीण्यालाही संस्थेत महत्त्व दिले जाते, असे त्यांनी सांगितले. खेळामुळे शिस्त, नेतृत्वगुण, आत्मविश्वास आणि संघभावना विकसित होते. समताच्या खेळाडूंनी दाखवलेली जिद्द आणि संघर्षवृत्ती कौतुकास्पद असून, भविष्यात ते राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही शाळेचा नावलौकिक वाढवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्राचार्य समीर अत्तार यांनीही संघाच्या कामगिरीचे कौतुक केले. क्रीडा स्पर्धांमधून विद्यार्थ्यांमध्ये निर्णयक्षमता, नेतृत्वगुण आणि आव्हानांना सामोरे जाण्याची वृत्ती विकसित होते. मैदानावरील अनुभव विद्यार्थ्यांना पराभवातून शिकण्याची आणि नव्या जोमाने पुढे जाण्याची प्रेरणा देतात. समताच्या खेळाडूंनी स्पर्धेदरम्यान दाखवलेला सांघिक समन्वय आणि लढाऊ बाणा इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.

या यशामागे रग्बी प्रशिक्षक सुनील चौधरी यांचे मार्गदर्शन, क्रीडा विभागाचे नियोजन, खेळाडूंचे परिश्रम आणि संस्थेचे सातत्यपूर्ण पाठबळ महत्त्वाचे ठरले. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल खेळाडू, प्रशिक्षक आणि क्रीडा विभागाचे अभिनंदन करण्यात आले.

समता इंटरनॅशनल स्कूलच्या संघाने मिळवलेले रौप्यपदक हे खेळाडूंच्या मेहनतीचे, शिस्तीचे आणि संघभावनेचे फलित आहे. या यशामुळे शाळेच्या क्रीडा परंपरेला नवी झळाळी मिळाली असून, मैदानावर आपल्या खेळाने ठसा उमटवणाऱ्या या युवा शिलेदारांची कामगिरी भविष्यातील मोठ्या यशाची नांदी ठरेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 5 8 8 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे