एस.एस.जी.एम. महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त “गाऊ विज्ञानाची ओवी” हा उपक्रम संपन्न

एस.एस.जी.एम. महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त
“गाऊ विज्ञानाची ओवी” हा उपक्रम संपन्न
कोपरगाव दि.२८ . रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरु गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अॅण्ड संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव येथील विज्ञान मंडळाअंतर्गत राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त डॉ. पंडित विद्यासागर लिखित जागतिक तसेच भारतीय संशोधकांची खडतर वाटचाल कथन करणारे काव्यगाथा “गाऊ विज्ञानाची ओवी” या पुस्तकाचे अभिवाचन ‘सृजनस्नेही संस्था, पुणे’ यांच्यावतीने संपन्न झाले.
कार्यक्रमाची ओळख करून देताना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंडित विद्यासागर यांनी, “आजचा कार्यक्रम हा ऐतिहासिक असून विज्ञानाचे ओव्यांचे नाट्यरूपांतर प्रथमच सादर होते आहे”, असे आवर्जून सांगितले. तसेच विज्ञानाची ओवी लिहिणारा हा जगातील सर्वात पहिला ग्रंथ असल्याचे सांगून मी कर्मवीरांपासून विज्ञान साहित्याची प्रेरणा घेऊन विज्ञान लोकांपर्यंत पोहोचवण्याचा हा केलेला प्रयत्न आहे, असेही स्पष्ट केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मा.श्री.सुधीर मोघे यांनी संहितावाचन करणाऱ्या सहकारी मान्यवरांचा संक्षिप्त परिचय करून दिला. त्यानंतर त्यांनी व संध्या रायते यांनी ख्रिस्तपूर्व काळातील शास्त्रज्ञ ‘आर्किमिडीज’ पासून ‘सुश्रुत’ कोपनिकर्स, विल्यम हार्वे, गॅलिलिओ, केपलर, मायकल फॅरेडे, लिओनार्डो दि विंची, बेंजामिन फ्रँकलिन, एडिसन अशा नामवंत शास्त्रज्ञांच्या कार्याचा व जीवनचरित्राचा संक्षिप्त आढावा घेतला. त्याचबरोबर भारतीय शास्त्रज्ञ आर्यभट्ट, ब्रम्हगुप्त, भास्कराचार्यापासून जगदीश चंद्र बोस, डॉ.पंडित विद्यासागर यांच्यापर्यंतच्या सर्व शास्त्रज्ञांचा परिचय करून दिला. यावेळी ‘मीनल गानू’ यांनी ‘विज्ञानाच्या या वैखरीत’, ‘जाऊ शास्त्रज्ञांच्या देशा’, ‘अवकाशाला गवसणी’, ‘विज्ञान अभ्यासके ग्रंथ वाचावा, इतरांशी तो समजावा’ अशा ओव्यांचे सादरीकरण केले.
कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रस्ताविक प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी केले. आपल्या प्रास्ताविकामध्ये विज्ञानाचा महोत्सव साजरा करण्यामागील उद्देश स्पष्ट करून सर्व मान्यवरांचे शब्द सुमनांनी स्वागत केले. सदर प्रसंगी श्री.अभिजीत मोघे, श्रीमती देशपांडे, मा. श्री संदीप माचवे, कला विभागाचे उपप्राचार्य डॉ. बाबासाहेब शेंडगे, विज्ञान विभागाचे उपप्राचार्य डॉ. मोहन सांगळे, वाणिज्य विभागाचे उपप्राचार्य डॉ. अर्जुन भागवत, यांच्यासह सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ.वैशाली सुपेकर व प्रा. प्रियंका काशीद यांनी केले.तर आभार IQAC समन्वयक डॉ. निलेश मालपुरे यांनी मानले.