Breaking
ब्रेकिंग

संजीवनी युवा प्रतिष्ठानचा नववा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा; विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान

0 0 1 7 5 0

संजीवनी युवा प्रतिष्ठानचा नववा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा; विविध क्षेत्रातील कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान

🔥 आग न्यूज पोर्टल नेटवर्क

कोपरगाव : युवकांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देत विविध नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून सेवाकार्याच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केलेल्या कोपरगाव येथील संजीवनी युवा प्रतिष्ठानचा नववा वर्धापन दिन शुक्रवारी (१२ जानेवारी २०२४) कलश लॉन्स येथे मोठ्या उत्साहात व दिमाखात साजरा करण्यात आला.

यानिमित्त प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या संकल्पनेतून युवकांसाठी वक्तृत्व, समूह नृत्य, सोलो नृत्य व पोस्टर स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करून कोपरगाव शहर व तालुक्याचा नावलौकिक वाढविणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.


या शानदार समारंभात कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न सुटण्यासाठी पंतप्रधान कार्यालयाकडून कार्यवाही पूर्ण करून घेण्यात मोलाचे योगदान देणारे राजेश बन्सीलाल मंटाला‌, गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी ५४ लाख रुपयांची मदत करणारे हेल्पिंग‌ हॅंडस या संस्थेचे प्रमुख चार्टर्ड अकाऊंटंट दत्तात्रय खेमनार‌ (सामाजिक), विविध जटील शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या करून अनेक रुग्णांना जीवदान देणारे डॉ. मयूर अण्णासाहेब तिरमखे (आरोग्य), धामोरी‌ येथील प्रगतिशील शेतकरी अशोकराव दशरथ भाकरे (कृषी), शिवछत्रपती क्रीडा पुरस्कारप्राप्त खेळाडू अक्षय आव्हाड, ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सारेगमप लिटिल चॅम्पस्-२०२३’ या स्पर्धेची विजेती ब्राह्मणगावची बालगायिका गौरी पगारे, एमपीएससी परीक्षेत यश मिळवलेली पूजा गवळी, नीलिमा नानकर आदींचा विवेकभैय्या कोल्हे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, शाल व बुके देऊन विशेष गौरव करण्यात आला. यावेळी नृत्य विशारद ऋतुजा धनेश्वर, परीक्षक अमोल निर्मळ यांचाही सत्कार करण्यात आला.

तसेच वक्तृत्व व पोस्टर स्पर्धेतील विजेत्यांना विवेकभैय्या कोल्हे व सत्कारमूर्तींच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ माँसाहेब,थोर विचारवंत स्वामी विवेकानंद व माजी मंत्री सहकारमहर्षी स्व. शंकरराव कोल्हे साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या कार्यावर आधारित डॉक्युमेंटरी दाखविण्यात आली.


यावेळी विवेकभैय्या कोल्हे म्हणाले, धार्मिक व पौराणिक वारसा लाभलेली कोपरगाव तालुका ही गुणवंतांची भूमी असून, कोपरगावचा पाणी प्रश्न सुटण्यासाठी पंतप्रधान कार्यालयापर्यंत यशस्वी पाठपुरावा केलेले राजेश मंटाला, हेल्पींग हॅण्डचे दत्तात्रय खेमनार, डॉ. मयूर तिरमखे, प्रगतिशील शेतकरी अशोकराव भाकरे, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अक्षय आव्हाड, सारेगमपा लिटिल चॅम्प विजेती गौरी पगारे,स्पर्धा परीक्षा यशस्वी नीलिमा नानकर व पूजा गवळी यांच्या देखील पालकांचा आदींचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. या सर्वांचे कार्य प्रेरणादायी असून, त्यांचा आदर्श युवा पिढीने घेतला पाहिजे.


माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी ८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण करावे, अशी शिकवण आम्हाला दिली. त्यानुसार स्व. कोल्हेसाहेबांचा वारसा पुढे चालवत वडील संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे व आई कोपरगावच्या प्रथम महिला आमदार स्नेहलताताई कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली समाजकार्य करण्याच्या उद्देशाने नऊ वर्षांपूर्वी आपण युवकांना एकत्र करून संजीवनी युवा प्रतिष्ठानची स्थापना केली. ‘जागवूया ज्योत माणुसकीची’ हा विचार घेऊन २०१५ साली लावलेल्या या वृक्षाचे आज मोठ्या वृक्षात रुपांतर झाले आहे.

युवा सशक्तीकरण, सामाजिक एकता, कृषी, आरोग्य, पर्यावरण या पाच क्षेत्रात संजीवनी युवा प्रतिष्ठानचे सर्व युवा सेवक सामाजिक बांधिलकी जपत नि:स्वार्थीपणे कार्य करत आहेत. संजीवनी युवा प्रतिष्ठानने समाजकार्य करण्याबरोबर युवकांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले असल्याचे सांगून प्रतिष्ठानच्या गेल्या नऊ वर्षांतील कार्याचा लेखाजोखा त्यांनी मांडला.


सध्या भारताची अर्थव्यवस्था ही जगातील पाचव्या क्रमाकांची मोठी अर्थव्यवस्था असून, भारत जागतिक महासत्तेच्या दिशेने वाटचाल करत आहे. राजमाता जिजाऊ माँसाहेबांनी जसे छत्रपती शिवाजी महाराजांना घडवले तसे सर्व माता-भगिनींनी आपल्या मुलांवर चांगले संस्कार करून उत्तम भावी पिढी घडवावी. आपण समाजाचे काही तरी देणे लागतो, या भावनेतून प्रत्येकाने आपल्या परीने समाजसेवा केली पाहिजे. भारतीय जवान सीमेवर राहून जशी देशसेवा करतात, त्याप्रमाणे आपणही आपल्या परिसरात राहून देशासाठी व समाजासाठी योगदान दिले पाहिजे. युवकांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून चांगल्या गोष्टी शिकल्या पाहिजेत. सामाजिक बांधिलकी जपत समाजकार्य करावे. संकटकाळी जनतेच्या मदतीला धावून जाणाऱ्या संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या कार्याला समाजानेही हातभार लावावा, अशी अपेक्षा व्यक्त करून, चला समाज परिवर्तन करूया, जग बदलूया, प्रगती करूया, असा संदेश त्यांनी दिला. स्वामी विवेकानंद, राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जयंतीच्या व संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या ९ व्या वर्धापन दिनानिमित्त त्यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या.
संजीवनी महिला स्वयंसहाय्यता बचत गटाच्या अध्यक्षा रेणुकाताई विवेकभैय्या कोल्हे यांनी नृत्य स्पर्धेदरम्यान उपस्थित राहून स्पर्धकांच्या कलागुणांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. विविध क्षेत्रातील मान्यवरांनी संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून युवा नेते विवेकभैय्या कोल्हे व युवा सेवकांनी हाती घेतलेल्या विविध समाजोपयोगी उपक्रमांचे विशेष कौतुक करून प्रतिष्ठानच्या कार्याला शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन रामदास गायकवाड यांनी केले. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवरांसह विविध संस्था, संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिक्षक, स्पर्धक, संजीवनी युवा प्रतिष्ठानचे युवा सेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोपरगाव तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी, बेरोजगार तरुणांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा करून सोनेवाडी येथे एमआयडीसी (औद्योगिक वसाहत) मंजूर करवून आणल्याबद्दल युवा नेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या अभिनंदनाचा ठराव यावेळी टाळ्यांच्या कडकडाटात मंजूर करण्यात आला. तसेच सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यास वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वतीने महाराष्ट्रातील सर्वात नावीन्यपूर्ण कारखाना म्हणून पुरस्कार मिळाल्याबद्दल कारखान्याचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे यांचा संजीवनी युवा प्रतिष्ठानच्या सर्व युवा सेवकांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 0 1 7 5 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे