
थकीत मालमत्ता करावरील दंड (शास्ती) माफ
महायुती शासनाचा स्वागतार्ह निर्णय – आ.आशुतोष काळे
कोळपेवाडी वार्ताहर – महायुती शासनाने राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायत हद्दीतील थकीत मालमत्ता करावर आकारण्यात येणारा दोन टक्के दंड (शास्ती) माफ करण्याचा घेतलेला निर्णय स्वागतार्ह असून सर्व सामान्य नागरीकांच्या अडचणींची जाणीव असणाऱ्या महायुती सरकारचे आ.आशुतोष काळे यांनी कोपरगावकरांच्या वतीने आभार मानले आहे.
आपल्या मालमत्तेचा कर शासनाला अदा करण्याची प्रत्येक नागरीकांची मानसीकता असते.परंतु अचानकपणे उद्भवणाऱ्या आर्थिक अडचणींमुळे सर्व सामान्य नागरिक मालमत्ता कर अदा करू शकत नाही. त्यामुळे हळू-हळू नागरीकांचा मालमत्ता कराची थकबाकी वाढतच जाते. नगरपरिषदा, नगरपंचायत व औद्योगिक क्षेत्रातील मालमत्तांच्या थकीत करांवर दरमहा दोन टक्के शास्ती लावण्याची तरतूद आहे.
त्यामुळे मालमत्ता धारकांच्या थकबाकीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होवून या दोन टक्के शास्ती वाढीच्या रक्कमेमुळे नागरीकांची मालमता कराची थकबाकी मोठ्या प्रमाणात वाढली होती व वाढलेली थकबाकी सर्वसामान्य नागरीकांना भरणे आवाक्याबाहेरचे होवून बसले होते.त्यामुळे थकबाकी वसुलीवर देखील मोठा परीणाम होत होता.
यावर उपाय योजना करण्यासाठी व सर्व सामान्य नागरीकांची कराच्या थकबाकीमुळे होणारी दमछाक थांबवून नागरीकांना कर भरण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशातून महायुती शासनाने थकीत मालमत्ता करावर आकारण्यात येणारा दोन टक्के शास्ती माफ करण्याचा अत्यंत महत्वाचा निर्णय घेतला असून त्याचबरोबर थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी ‘अभय योजना’ देखील लागू केली आहे.
त्यामुळे कोपरगावकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. वेळेत मालमत्ता कर न भरू शकलेल्या मालमत्ताधारकांना याचा मोठा फायदा होणार असून यामुळे थकीत मालमत्ता कर धारकांच्या चिंता दूर झाल्या आहेत.
त्याबद्दल आ. आशुतोष काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री तथा नगरविकासमंत्री ना.एकनाथ शिंदे यांचे कोपरगावकरांच्या वतीने आभार मानले आहे. या संधीचा लाभ घेवून कोपरगाव शहरातील नागरिकांनी लवकरात लवकर आपले शास्ती माफीचे प्रस्ताव कोपरगाव नगरपरिषदेकडे सादर करावेत असे आवाहन आ. आशुतोष काळे यांनी केले आहे.