गोदावरी बायोरिफायनरीज लि. चे समीर सोमैया यांचा जागतिक गौरव; ‘प्लिनिओ नस्तानी शुगर एक्सलन्स’ पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय

गोदावरी बायोरिफायनरीज लि. चे समीर सोमैया यांचा जागतिक गौरव; ‘प्लिनिओ नस्तानी शुगर एक्सलन्स’ पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय
साकरवाडी: गोदावरी बायोरिफायनरीज लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. समीर सोमैया यांना अत्यंत प्रतिष्ठेच्या जागतिक स्तरावरील ‘प्लिनिओ नस्तानी शुगर एक्सलन्स अवॉर्ड’ (Plinio Nastari Sugar Excellence Award) लंडन येथे पार पडलेल्या ३४ व्या ‘आय.एस.ओ.’ (ISO) आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये सन्मानित करण्यात आले आहे. डिसेंबर २०२५ चा हा क्षण भारताच्या साखर आणि जैव ऊर्जा (Bioenergy) क्षेत्रासाठी ऐतिहासिक ठरला, कारण हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले भारतीय नागरिक ठरले आहेत. हा पुरस्कार केवळ साखरेच्या उत्पादनासाठी नाही, तर शाश्वत शेती (Sustainable Agriculture), जैव ऊर्जा आणि ग्रामीण विकासासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाचा सन्मान आहे. समीर सोमैया यांनी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे जीवन उंचावण्यासाठी आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी ‘ग्रीन ग्रोथ’चा जो मंत्र दिला, त्याचे कौतुक आज संपूर्ण जग करत आहे. आज जेव्हा आपण हवामान बदलावर चर्चा करतो, तेव्हा सोमैयाजींनी जैव ऊर्जेच्या माध्यमातून जगाला एक नवी दिशा दाखवली आहे.

या ऐतिहासिक यशाबद्दल साकरवाडी येथील गोदावरी बायोरिफायनरीजच्या प्रकल्पात एका भव्य सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात कंपनीचे संचालक सुहास गोडगे यांनी समीर सोमैया यांचा पुष्पगुच्छ आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची पंचधातूची भव्य मूर्ती देऊन विशेष सत्कार केला. सोमैया यांच्या या जागतिक यशामुळे केवळ कंपनीचीच नव्हे, तर संपूर्ण देशाची मान अभिमानाने उंचावली असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

सत्काराला उत्तर देताना समीर सोमैया यांनी आपल्या प्रवासातील आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, “सुमारे २५-३० वर्षांपूर्वी साखर उद्योग मोठ्या संकटात होता. उत्पादित झालेली साखर विक्रीअभावी २-३ वर्षे गोदामात पडून राहायची. अशा कठीण काळात आम्ही फक्त साखरेवर अवलंबून न राहता, ‘शुगर ज्यूस’ आणि ‘बी-हेवी मोलासेस’पासून इथेनॉल निर्मितीचा विचार मांडला. त्यावेळी अनेकांना हा विचार अकल्पनीय वाटला होता, पण आज संपूर्ण जग याच ‘इथेनॉल मॉडेल’चा स्वीकार करत आहे.” “माझ्या व्यवसायात कुटुंबातील किती लोक आहेत, असे जेव्हा मला विचारले जाते, तेव्हा मी अभिमानाने सांगतो की—गोदावरी बायोरिफायनरीजमध्ये काम करणारा प्रत्येक कामगार आणि अधिकारी हा माझ्या कुटुंबातील सदस्य आहे.”
भारताच्या ऊर्जा क्षेत्रात आज जे मोठे बदल दिसत आहेत, त्याचे बीज सोमैया यांनी अनेक वर्षांपूर्वीच रोवले होते. त्यांच्या जिद्दीचे उत्तम उदाहरण म्हणजे, केवळ ५ ते ६ वर्षांच्या अल्प कालावधीत त्यांनी कंपनीच्या डिस्टिलरीची क्षमता ६० KLPD वरून थेट ६०० KLPD पर्यंत वाढवून एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे.

या सोहळ्यासाठी कंपनीचे सीटीओ (CTO) प्रवीण विभुते, जनरल मॅनेजर डॉ. गणेश गंडी, कोपरगाव तालुका साखर कामगार संघटनेचे पदाधिकारी, गोदावरी बायोरिफायनरीज कामगार पतपेढीचे पदाधिकारी, तसेच सर्व अधिकारी व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कामगार वर्गामध्ये या पुरस्कारामुळे उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.






