राष्ट्रीय आयुर्वेद गुरू डॉ.रामदास आव्हाड यांचा शनिवारी कोपरगावात जाहीर नागरी सत्कार
राष्ट्रीय आयुर्वेद गुरू डॉ.रामदास आव्हाड यांचा शनिवारी कोपरगावात जाहीर नागरी सत्कार
🔥 आग न्यूज पोर्टल नेटवर्क
कोपरगाव :–
कोपरगाव येथील राष्ट्रीय आयुर्वेद गुरू डॉ. रामदास म्हाळूजी आव्हाड यांना भारत सरकारच्या आयुष मंत्रालयातर्फे दिला जाणारा भारतीय वैद्यक क्षेत्रातील मानाचा राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेद पुरस्कार मिळाल्याबद्दल माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी (९ डिसेंबर) डॉ. आव्हाड यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात येणार आहे.
राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेद पुरस्कार हा आयुर्वेद क्षेत्रातील भारत सरकारतर्फे दिला जाणारा हा सर्वोच्च पुरस्कार समजला जातो. या पुरस्कारासाठी महाराष्ट्रातून एकमेव डॉ. रामदास आव्हाड यांची निवड झाली आहे. गेल्या ३५ वर्षांपासून कोपरगावसारख्या ग्रामीण भागात राहून नि:स्वार्थीपणे रुग्णसेवा करणाऱ्या आयुर्वेदाचार्य डॉ.रामदास आव्हाड यांना हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाल्याने कोपरगावच्या नावलौकिकात भर पडली आहे. आयुर्वेद क्षेत्रात उत्तुंग कामगिरी बजावणाऱ्या डॉ. रामदास आव्हाड यांना आजपर्यंत राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेद पुरस्कारासह ४४ हून अधिक राज्य ,राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. डॉ. आव्हाड यांनी सर्वोच्च राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेदॲवार्ड पुरस्कार पटकावून कोपरगावचा नावलौकिक वाढवला असून, त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी कोपरगाव शहर नागरी सत्कार समितीच्या वतीने शनिवारी सायंकाळी ६ वाजता त्यांचा शहरातील कृष्णाई मंगल कार्यालयात जाहीर नागरी सत्कार करण्यात येणार आहे. या सत्कार समारंभास सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन नागरी सत्कार समितीतर्फे करण्यात आले आहे.
आयुर्वेदतज्ज्ञ डॉ. रामदास आव्हाड यांची भारत सरकारच्या आयुष मंत्रालयद्वारा संचलित दिल्ली येथील राष्ट्रीय आयुर्वेद विद्यापीठातर्फे सलग आठव्यांदा राष्ट्रीय आयुर्वेद गुरू म्हणून निवड झालेली आहे. सन २०१० पासून ते या पदावर कार्यरत आहेत. महाराष्ट्र आयुर्वेद संमेलनचे अध्यक्ष म्हणून काम करताना डॉ. आव्हाड यांनी आयुर्वेद उपचार पद्धतीच्या प्रचार व प्रसारासाठी मोठे कार्य केले आहे. त्यांनी गेल्या वर्षी कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण येथील विश्वात्मक जंगली महाराज आश्रमात राष्ट्रीय स्तरावरील आयुर्वेद पर्व संमेलनाचे यशस्वीरित्या आयोजन केले होते. या संमेलनाद्वारे परिसरातील नागरिकांना अनेक जगविख्यात आयुर्वेदतज्ज्ञांचे मार्गदर्शन प्राप्त झाले होते. डॉ. आव्हाड हे कोपरगावात धन्वंतरी आयुर्वेद पंचकर्म ट्रेनिंग सेंटर चालवतात. या सेंटरच्या माध्यमातून ते भारतात प्राचीन काळापासून प्रचलित असणाऱ्या सुमारे ३ हजार वर्षांपासून चालत आलेल्या आयुर्वेदातील उपचार पद्धतीद्वारे वनौषधी, वनस्पतीजन्य औषधी, आहाराचे नियम, व्यायामाचे विविध प्रकार याद्वारे शरीरातील नैसर्गिकरीत्या प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करण्याकरिता सबंध भारतातील रुग्णांवर यशस्वी उपचार करत आहेत. शिर्डी येथे साईबाबांच्या दरबारात गेल्या एकोणवीस वर्षांपासून ते दर गुरुवारी न चुकता मोफत रुग्णसेवा देत आहेत. डॉ. आव्हाड यांच्याकडे आयुर्वेदाचे प्रशिक्षण घेतलेले हजारोंच्या वर डॉक्टर्स आज संपूर्ण भारतभरात आयुर्वेदाद्वारे रुग्णसेवा देत आहेत.