सकल वंचितांचा आधार वड– कालकथित नानासाहेब भिकाजी जगताप

सकल वंचितांचा आधार वड– कालकथित नानासाहेब भिकाजी जगताप
अहिल्या नगर , नासिक , औरंगाबाद जिल्ह्यातील नैसर्गिक, आर्थिक, सामाजिकदृष्ट्या मागासलेल्या वंचितांसाठी धम्म व आंबेडकर चळवळीतीला खंबीर पणे आधार देतांना अंधश्रद्धाळू फॅसिस्ट व राजकीय, जातीय आणि धर्मांधांच्या कोणत्याही आमिषाला बळी न पडता कोणत्याही व्यासपीठावर केवळ नि केवळ बोलबच्चन न करता प्रत्यक्षात आयुष्यभर अहोरात्र स्वतःला झोकून देत वंचितांचा आधारवड बनलेल्या कालकथित नानासाहेब जगताप यांच्या कार्याची पोकळी अवघ्या आठ दिवसांत प्रखरपणे जाणवत असल्याने त्यांचे अमुल्य,अतुल्य चिरंजीवी विचार आणि कार्य केवळ सर्व धर्मिय वंचितांचा कायमस्वरूपी आधारवड व दिपस्तंभ ठरत असल्याचे सिद्ध झाले आहे..
काल कथित नानासाहेब जगताप यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीशी झगडत असताना स्वतःला सामाजिक कार्यात सर्व प्रकारचे बल लाभावे यासाठी सर्व धर्म ग्रंथ,संत महात्मे सामाजिक , राजकीय नेते यांच्या जीवन कार्य सामाजिक विचार धारा आणि कार्याचा सखोल अभ्यास व वाचन करतांना आपल्या सभोवताली असलेल्या वंचिताना आधार देण्यासाठी प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष प्रत्येक वंचितांना आपल्यात सामावून घेतले. शिक्षणानंतर कौटुंबिक गरजाच नव्हे तर सामाजिक कार्यातील गरजाकरिता कोणापुढे हात पसरावा न लागता सामाजिक कार्याला पाठबळ मिळावे यासाठी कोपरगांव तालुका मर्चंट बॅंकेत नोकरी पत्करली.
याच बळावरिल ज्ञानलालसा, सामाजिक सहभागातून वंचितांच्या सर्वांगीण समस्यांच्या झळीचे स्वतःला चटके बसल्यावर त्यांच्यातील पत्रकार, कवी कधी जागृत झाल्यावर त्यांनी स्वतःला कधी धम्म व आंबेडकर चळवळीत झोकून दिले.हे त्यांनाच समजले नाही. या चळवळीतील समस्या सोडवण्यासाठी सर्व जाती धर्मातील सामाजिक कार्यकर्त्यांशी वंचितांशी सलगी वाढवली. यातून आम्हा दोघांनाही बरेच काही शिकायला मिळाले. माझ्या सारख्या अनेकांशी रस्त्याचेकडेला, वाचनालयात, चहा पितांना सामाजिक कार्यात सामाजिक कार्य विचारमंथन वैचारिक देवाणघेवाण गेली पन्नास वर्षे चालू राहिली, कालकथित नानासाहेब भिकाजी जगताप यांनी भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा कार्याध्यक्ष , कोपरगांव तालुका माजी अध्यक्ष तसेच विविध संघटनामध्ये विविध पदांचा यशस्वीपणे कार्याभार सांभाळला , आदर्श बौद्धाचार्य, आंबेडकर चळवळीत एकनिष्ठतेने महात्मा फुले,भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा व धम्म चळवळ शहरी व ग्रामीण भागात घरोघरी सायकलवर जातांना वंचितांशीप्रत्यक्ष विचार मंथनातून रुजवून जोपासली.
३५ ते ४० वर्षांपूर्वी धम्म परंपरागत विवाह, धार्मिक कार्य विधी यथायोग्य पध्दतीने पार पाडणारांची वाणवा होती. यावेळी स्वतः समाज मान्यता प्राप्त पदाधिकांऱ्याकडून हे विधी शिकून घेतले, ह्या विधींसाठी विनामोबदला कार्य करतांना समाजातील शेकडो तरुणांना प्रोत्साहित करून स्वतः शिकवले
आपल्या कमाईचा फार मोठा वाटा सामाजिक कार्यावर खर्च होत असल्याने त्यांची आर्थिक परिस्थिती यथातथाच राहिली. परंतु त्यांना नाउमेद न करता आमच्या वहिनी साहेब लताताई यांनी छोटेसे किराणा दुकान घरातच सुरू केले. दोघांनी आपली दोन्ही मुले आणि दोन मुलींच्या शिक्षणासाठी कसर ठेवली नाही. यापैकी रविंद्र याने एम. एन. नंतर पत्रकारितेमध्ये नावलौकिक कमावला तर सतिश आज एका हैदराबाद येथील नामवंत कंपनीत वरिष्ठ पदावर कार्यरत आहे. याशिवाय सौ . पल्लवी अनिल गायकवाड आणि सौ.राजश्री प्रमोद गजभिये याही सामाजिक व धार्मिक कार्यात अग्रेसर आहेत. कालकथित नानासाहेब भिकाजी जगताप यांच्या कार्याची दखल बौद्ध समाज, धम्म व आंबेडकर चळवळ, विविध सामाजिक, साहित्यक्षेत्रातील राज्य, जिल्हा स्थानिक स़ंघटनांकडून पन्नासावर पुरस्कार देऊन काल कथित नानासाहेब भिकाजी जगताप यांना गौरविण्यात आले आहे..
अशा महान आत्म्याचरणी भावपूर्ण श्रद्धांजली तसेच या चिरंजीवी आत्म्याला कायमस्वरूपी चिरशांती व सद्गती प्राप्त होवो आणि या दु:खातून सावरण्यासाठी परमेश्वराने सर्व प्रकारचे बल देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!!!
– अरुण आहेर कोपरगांव ९०९६६६४५३३