उत्तम वक्तृत्वातूनच प्रभावी विचार मांडणी शक्य – श्री. सुनील जगताप

उत्तम वक्तृत्वातूनच प्रभावी विचार मांडणी शक्य – श्री. सुनील जगताप
कोपरगाव, दि: “ज्या व्यक्तीचे वक्तृत्व प्रभावी असते, तीच व्यक्ती आपले विचार समाजासमोर आत्मविश्वासाने मांडू शकते. आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ ज्ञान पुरेसे नसून ते योग्य शब्दांत आणि योग्य पद्धतीने व्यक्त करता येणे महत्त्वाचे आहे,” असे प्रतिपादन पुणे येथील प्रसिद्ध उद्योगपती मा. श्री. सुनील जगताप यांनी केले. ते रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरु गंगागीर महाराज विज्ञान, गौतम आर्ट्स ॲन्ड संजीवनी कॉमर्स कॉलेज, कोपरगाव येथे कै. सौ. सुशीलाबाई शंकरराव काळे ऊर्फ माई यांच्या स्मरणार्थ आयोजित आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा (रौप्य महोत्सवी वर्ष) उद्घाटनप्रसंगी बोलत होते. यावेळी त्यांनी माईंच्या सामाजिक जाणिवा व संस्कारांचे महत्त्व अधोरेखित केले. सदर वक्तृत्व स्पर्धेचे अध्यक्षस्थान आर. बी. एन. बी. महाविद्यालय श्रीरामपूर येथील माजी इतिहास प्रमुख प्रा. डॉ.सुनील खिलारी यांनी भूषविले. सदर स्पर्धेसाठी रयत शिक्षण संस्थेचे व्हा.चेअरमन व महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन ॲड.भगीरथ शिंदे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या.

अध्यक्षीय भाषणात प्रा. सुनील खिलारी यांनी “स्त्रीशक्ती समाजाला सकारात्मक दिशा देणारी व प्रेरणादायी ठरू शकते, याचे कै. सौ. सुशीलाबाई शंकरराव काळे ऊर्फ माई हे अत्यंत बोलके व जिवंत उदाहरण आहे. त्यांच्या जीवनकार्याने सामाजिक जाणीव, संस्कार आणि सेवाभावाची मूल्ये समाजासमोर अधोरेखित केली आहेत.”असे सांगितले. यावेळी स्पर्धक कु. श्रुती औताडे हिने व परीक्षक डॉ. जिभाऊ मोरे यांनी प्रातिनिधिक स्वरूपात आपले मनोगत व्यक्त केले.

स्पर्धेचे प्रास्ताविक करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधव सरोदे यांनी, “राज्यभरातील विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अधोरेखित करत हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या वैचारिक क्षमता, अभिव्यक्ती स्वातंत्र्य व व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणारा ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. पाहुण्यांचा परिचय डॉ. संतोष पवार यांनी करून दिला.

कार्यक्रमास कला शाखेचे उपप्राचार्य डॉ. बंडेराव तऱ्हाळ, विज्ञान शाखेचे उपप्राचार्य डॉ. घनश्याम भगत, वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य डॉ. अर्जुन भागवत, परीक्षक प्रा. सुशीला ठाणगे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री. संजय शिंदे, कार्यालयीन अधीक्षक श्री. सुनील गोसावी यांच्यासह प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सीमा दाभाडे व डॉ. भागवत देवकाते यांनी केले, तर आभारप्रदर्शन डॉ. माधव यशवंत यांनी केले.






