श्रीरामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा सण- उत्सवाची परंपरा जोपासत सर्वत्र साजरा करा…- मठाधिपती रमेशगिरीजी महाराज यांचा आदेश
श्रीरामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा सण- उत्सवाची परंपरा जोपासत सर्वत्र साजरा करा…– मठाधिपती रमेशगिरीजी महाराज यांचा आदेश
अयोध्या येथे होणारा श्रीरामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा सण- उत्सवाप्रमाणे धार्मिक देवस्थानासह घरोघरी गुढी उभारून, दारापुढे सडा-रांगोळी करुन सायंकाळी दिवे लावत भारतवर्षाची महान परंपरा जोपासत सर्वांनी सहभागी होवून सर्वत्र साजरा करण्याचे आदेश राष्ट्रसंत जनार्दनस्वामी महाराज आश्रम कोपरगांवचे मठाधिपती रमेशगिरीजी महाराज यांनी एका विशेष कार्यक्रमात दिले.
श्रीराम जन्मभुमी न्यास, अयोध्या, विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, बजरंग दल आणि श्रीराम भक्तांच्या विशेष सहभागातून श्री क्षेत्र अयोध्या येथे २२ जानेवारी २०२४ रोजी होणाऱ्या श्रीरामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे समस्त भारतीय यांना मंगल अक्षता आणि पत्रिका वाटपाचा शुभारंभ झाला आहे.
श्रीराम जन्मभुमी अयोध्या येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक करणारे गागाभट्ट यांचे वंशज विद्वान पंडित लक्ष्मीकांत दिक्षित आणि संत-महंत ,पौरोहित्य मंत्रोच्चार करुन अक्षता मंगल कलश तयार करण्यात आले आहे.या मंगल अक्षदा भारतात ठिकठिकाणी खंड- उपखंडात भारतीयांना निमंत्रण म्हणून पाठविण्यात आल्या आहेत.
कोपरगांव गांवठाण तिर्थक्षेत्रातील ग्रामदेव-देवता स्थानांना निमंत्रणाचे आणि अक्षदा कलशाचे वितरणाचे विशेष आयोजन गोदातीर कोपरगांव येथील गोदातीरावर असलेल्या श्री क्षेत्र दत्तपार येथील श्रीराम मंदिरात करण्यात आले होते.या प्रसंगी राष्ट्रसंत जनार्दनस्वामी महाराज आश्रम कोपरगांवचे मठाधिपती रमेशगिरीजी महाराज यांचे शुभहस्ते मंगल अक्षदा कलश वितरण आणि आशिर्वचनाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी ग्रामदैवत गोकर्ण गणेश देवस्थानचे अध्यक्ष सुभाष महाजन,प्रदिपशास्री पदे,श्री क्षेत्र दत्तपारचे अध्यक्ष रविंद्र को-हाळकर, मराठा पंच मंडळाचे अध्यक्ष अॅड. संजय भोकरे, श्रीमंत महामहीम पवार सरकार संस्थान महादेव देवस्थानचे प्रमुख महेंद्र पाटील,मुख्य कार्यकारी अधिकारी सुशांत घोडके, बिरोबा (वीरभद्र) देवस्थानचे विठ्ठलराव मैदड,खंडोबा देवस्थानचे चंद्रकांत देवरे, गुरु शुक्राचार्य देवस्थानचे राजाराम पावरा, नरेंद्र जोशी,लक्ष्मी आई देवस्थानचे वैभव आढाव,गोरख कानडे,मुंबादेवी देवस्थानचे सोमनाथ गंगुले,जुनी गंगा देवस्थानचे विलास नाईकवाडे, म्हसोबा देवस्थानचे नारायण गर्जे,श्री स्वामी समर्थ केंद्राचे अॅड. जयंत जोशी,ज्ञानेश्वर गायकवाड, दिगंबर जैन मंदिराचे पंच महावीर दगडे, श्री श्वेतांबर जैन मंदिराचे अरविंद पोरवाल, जैन स्थानकाचे संघपती प्रेम भंडारी, गुरुद्वारा चे सुखदिपसिंह साहणी, तुळजाभवानी मंदिराचे दत्ता काले,श्री काळभैरवनाथ देवस्थानचे सुनील पांडे, श्रीमंत महादेव मंदिर बेटचे कैलास आव्हाड,बालाजी मंदिराचे पवन डागा, विश्वनाथ राठी यांचेसह गांवठाण मंदिर व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते.
प्रारंभी राष्ट्रसंत जनार्दनस्वामी महाराज आश्रम कोपरगांवचे मठाधिपती रमेशगिरीजी महाराज यांचे शुभहस्ते श्री क्षेत्र दत्तपार येथील प्रभूश्रीराम, सितामाई, लक्ष्मण, हनुमान मुर्ती पुजन, श्री दत्त पुजन, मंगल अक्षदा कलश आणि निमंत्रण पत्रिका पुजन करण्यात आले. पौरोहित्य वैभव जोशी, वेदमूर्ती शाम जोशी, पवन आंबोरे, सुनील मळेगांवकर, यांनी सामुदायिक रामरक्षा पठण केले.
राष्ट्रसंत जनार्दनस्वामी महाराज आश्रम कोपरगांवचे मठाधिपती रमेशगिरीजी महाराज यांना अयोध्या येथे होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे विशेष निमंत्रण प्राप्त झाल्याने सर्व ग्रामदेवता प्रमुखांनी उभे राहून टाळ्यावाजवत आणि श्रीराम जयघोषात अभिनंदन ठराव संमत केला. त्यानंतर संत पुजन श्री क्षेत्र दत्तपार विश्वस्तांनी केले.
याप्रसंगी प्रमुख वक्ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सागर भिमराव बडदे यांनी श्रीराम जन्मस्थान ते भव्य मंदिर निर्माण ईतिहास सविस्तर विषद केला. तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संपर्क प्रमुख अॅड. जयंत जोशी यांनी अयोध्या येथील भव्य श्रीराम मंदिराच्या पायापासून ते कळसापर्यंत रचना विषद केली.
अक्षदा वितरण करतांना प्रत्येक ग्रामदेव-देवतेचे नामस्मरणकरुन जयघोष करण्यात आला. उपस्थितांचे स्वागत अभियानाचे प्रमुख निलेश जाधव यांनी तर सुत्रसंचलन सुशांत घोडके यांनी केले. आभार ललित ठोंबरे यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी बालाजी आंबोरे, ललित ठोंबरे,सचिन कुलकर्णी,दिपक सिनगर,मुकुंद उदावंत,गणेश कानडे यांचेसह ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.
शेवटी सामुदायिक आरती आणि प्रसाद वाटपाने कार्यक्रमाची सांगता झाली. अयोध्या येथील श्रीरामलल्ला प्राणप्रतिष्ठा निमित्ताने गांवठाण भागातील देवस्थानामार्फत विविध कार्यक्रम नियोजन केले जात आहे.