विखेंच्या अन्यायी सत्तेला सुरुंग लावण्यासाठी जनतेचे नेतृत्व करायला मी क्षणभरही मागे हटणार नाही-विवेक कोल्हे
विखेंच्या अन्यायी सत्तेला सुरुंग लावण्यासाठी जनतेचे नेतृत्व करायला मी क्षणभरही मागे हटणार नाही-विवेक कोल्हे
🔥 आग न्यूज पोर्टल नेटवर्क
कोपरगाव : — पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे जिल्हा नियोजन समितीअंतर्गत कोपरगाव विधानसभा मतदारसंघासाठी विकास कामे मंजूर करताना दुजाभाव करत असून, राजकीय द्वेषभावनेतून त्यांनी ग्रामपंचायतींना विविध योजनांतर्गत शासनाकडून मिळणारा निधी जाणीवपूर्वक अडवला आहे. त्यांनी हजारो दलित, आदिवासी समाजबांधवांसह गोरगरीब जनतेला शासकीय विकास निधीपासून वंचित ठेवले आहे. ते कोपरगाव व राहाता तालुक्यातील जनतेवर जाणीवपूर्वक अन्याय करीत असून, हा अन्याय थांबविण्यासाठी मी विखेंच्या विरोधात जनतेचे नेतृत्व करायला कधीही तयार आहे, असे सांगत सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष युवा नेते विवेक कोल्हे यांनी विखे पाटलांवर घणाघाती टीका केली.
जनतेचे प्रश्न सोडवून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी वेळप्रसंगी आपण विखेंच्या विरोधात नेतृत्वाचा विडा उचलण्यास समर्थ आहोत असे सूतोवाचही कोल्हे यांनी केले.
कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील ग्रामपंचायतींना विविध योजनांतर्गत मिळणाऱ्या शासकीय निधी वितरणात पालकमंत्री विखे यांच्याकडून जाणीवपूर्वक झालेल्या अन्यायाच्या निषेधार्थ व जनतेच्या विविध प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी युवा नेते विवेक कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली शिर्डी येथील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.
शिर्डीतील शासकीय विश्रामगृहापासून निघालेल्या या मोर्चात कोपरगाव मतदारसंघातील ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, ग्रा. पं सदस्य, विविध कार्यकारी सहकारी संस्थांचे संचालक, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे व गणेश साखर कारखान्याचे संचालक, भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
हातात काळे झेंडे घेऊन, भारतमाता की जय, छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयघोष करत निघालेल्या मोर्चेकऱ्यांनी विवेक कोल्हे तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, स्नेहलताताई कोल्हे आगे बढो, दलित, आदिवासींचा व ग्रामपंचायतींचा निधी अडवणाऱ्या पालकमंत्र्यांचा निषेध असो, नही चलेगी, नही चलेगी, दादागिरी नही चलेगी, पालकमंत्र्यांचे करायचे काय, खाली डोके वर पाय, निधी आमच्या हक्काचा, नाही कुणाच्या बापाचा, पालकमंत्र्यांचा दुजाभाव, सुरू आहे राजकीय डाव, हुकूमशाही बंद करा, कोण म्हणतो देणार नाही, आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही, शासकीय निधी वितरणात दुजाभाव नको, पाटपाण्याचा बट्ट्याबोळ, शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळ अशा विविध घोषणांनी संपूर्ण शिर्डी नगरी दणाणून सोडली होती.
या मोर्चाच्या निमित्ताने विवेक कोल्हे यांनी जोरदार टोलेबाजी करत राज्याचे महसूलमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना ललकारत पुन्हा एकदा त्यांच्यावर टीकेची तोफ डागली. त्यांनी खा. सुजय विखे, आ. आशुतोष काळे यांच्यावरही जोरदार टीका केली. मोर्चेकऱ्यांतर्फे युवा नेते विवेक कोल्हे, भाजपचे तालुकाध्यक्ष कैलास रहाणे, शहराध्यक्ष डी. आर. काले, कोल्हे कारखान्याचे उपाध्यक्ष मनेश गाडे आदींनी दिलेले विविध मागण्यांचे निवेदन निवासी नायब तहसीलदार नवनाथ लांडगे यांनी स्वीकारले.
अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चेकऱ्यांसमोर बोलताना विवेक कोल्हे म्हणाले, पालकमंत्री विखे पाटील हे स्वत:च्या राजकीय स्वार्थापोटी भाजप कार्यकर्त्यांचे खच्चीकरण करून प्रतिस्पर्ध्यांना संपवण्यासाठी मुस्कटदाबी व दडपशाहीचे राजकारण करत आहेत. ते संपूर्ण जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत; पण शासकीय निधी वाटपात ते दुजाभाव करत असून, ‘अडवा आणि जिरवा’ पद्धतीचे राजकारण करून आमच्यासारख्या पक्षातील निष्ठावान नेत्यांना हेतूत: त्रास देत आहेत. त्यांनी आ. आशुतोष काळे यांना हाताशी धरून कोपरगाव मतदारसंघातील कोल्हे गटाच्या ताब्यातील ग्रामपंचायतींना शासनाकडून मिळणारा विकास निधी जाणीवपूर्वक रोखून धरला आहे. गेल्या दीड-दोन वर्षापासून त्यांचा मनमानी कारभार सुरू आहे. गेल्या ३० ते ४० वर्षांपासून विखे यांच्या कुटुंबात आमदार, खासदार, मंत्री, जिल्हा परिषद अध्यक्ष अशी सत्तेची विविध पदे आहेत; पण सत्ताकाळात त्यांनी जनतेचे विकासाचे प्रश्न सोडविण्याऐवजी फक्त स्वत:ची राजकीय पोळी भाजून घेण्याचे काम केले.
पालकमंत्र्यांच्या मनमानी कारभाराने अनेक गावांतील पाणी, रस्ते, सिंचनासह विकासाचे अनेक प्रश्न रखडले आहेत. त्यांनी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटक वस्ती विकास योजना, दलित वस्ती सुधार योजना, ठक्कर बाप्पा, गाय गोठा योजना, जनसुविधा योजना, वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना, घरकुल योजना, जलजीवन मिशन, सिंचन विहीर योजना, अल्पसंख्याक निधी, शौचालय योजना, सामाजिक कल्याणकारी योजना अशा विविध योजनांचा निधी जाणीवपूर्वक दिला नाही. ३०-५४, ९०-१०, २५-१५, ५०-५४ यातून होणारी कामेही अडवली असून, आम्ही कोपरगाव तालुक्यातून दिलेले ५० पेक्षा अधिक शेळी-मेंढी पालन संस्थेचे प्रस्ताव त्यांनी दीड वर्षांपासून प्रलंबित ठेवले आहेत.
माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांचा जनसेवेचा वारसा आम्ही चालवत असून, शेतकरी, दिन-दुबळ्यांचे प्रश्न जो सोडवेल तोच आमचा पक्ष हे आमचे धोरण आहे. आम्ही व्यापक समाजहिताची भूमिका घेऊन राजकारण करत आहोत. मात्र, विखे पाटील संकुचित दृष्टिकोन ठेवून गलिच्छ राजकारण करत आहेत. भाजप सत्तेत असूनही पालकमंत्री विखे यांच्याकडून आमच्या कार्यकर्त्यांवर अन्याय होत आहे, गळचेपी होत आहे. आम्ही किती संयम ठेवायचा? स्व. कोल्हे साहेबांनी नावारूपाला आणलेला गणेश कारखाना, गोदावरी दूध संघ कुणी रसातळाला नेला, आपल्या मेहुण्याला निवडणुकीत उभे करून बिपीनदादा कोल्हे व स्नेहलताताई कोल्हे यांचा पराभवाला कुणी हातभार लावला हे सर्वांना ज्ञात आहे. मी लढवय्ये नेते स्व. कोल्हे साहेबांचा नातू आहे. जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी आज मी रस्त्यावर उतरलो आहे. आम्ही राजकीय स्वार्थासाठी आ. काळे यांच्यासारखे गुडघ्यावर बसून तुमचे पाय चेपणार नाही तर स्वाभिमानाने जनतेच्या प्रश्नांसाठी लढत राहू. कोपरगाव मतदारसंघातील जनता आ. आशुतोष काळेंच्या निष्क्रियतेला पुरती कंटाळली असून, अशा निष्क्रिय आमदारांची गॅरंटी तुम्ही घेता. तुम्ही आमची काळजी करू नका, आमची गॅरंटी कोपरगाव व राहाता तालुक्यातील जनता निश्चितच घेईल. तुमच्या जिरवाजिरवी, दडपशाही व हुकूमशाहीच्या राजकारणाला जशास तसे उत्तर देऊ, असा इशाराही त्यांनी विखे पिता-पुत्रांना दिला.
यावेळी किसनराव गव्हाळे, धनंजय जाधव, चंद्रकांत धनवटे, विक्रम पाचोरे, जितेंद्र रणशूर, शिवाजीराव लहारे, साहेबराव रोहोम, कैलास रहाणे, डॉ. मोरे, सरपंच संदीप देवकर, अनुराग येवले, कानिफ गुंजाळ आदींनी पालकमंत्री विखे पाटील व आ. आशुतोष काळे यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली. सूत्रसंचालन दीपक चौधरी यांनी केला.