राज्य फेडरेशनच्या शिष्टमंडळाला यश ; जिल्हा बँकेचा पतसंस्थाभिमुख निर्णय – काका कोयटे, अध्यक्ष

राज्य फेडरेशनच्या शिष्टमंडळाला यश ; जिल्हा बँकेचा पतसंस्थाभिमुख निर्णय – काका कोयटे, अध्यक्ष
अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने जिल्ह्यातील सहकारी पतसंस्थांसाठी अर्धा टक्का ज्यादा म्हणजेच एका वर्षासाठी ७.४० टक्के इतका आकर्षक व्याजदर घोषित केला आहे. या निर्णयाचे स्वागत करत अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व सहकारी पतसंस्थांनी आपल्या ठेवी अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतच गुंतवाव्यात, असे आवाहन महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, फेडरेशन ऑफ मल्टीस्टेट को-ऑप. क्रेडिट सोसायटीचे अध्यक्ष सुरेश वाबळे आणि नाशिक जिल्हा विभागीय सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष वसंतशेठ लोढा यांनी केले आहे

याबाबत अधिक माहिती देताना राज्य फेडरेशन अध्यक्ष काका कोयटे म्हणाले की, जिल्ह्यातील सहकारी पतसंस्थांची ज्यादा व्याजदराची मागणी अनेक वर्षांपासून होती. मात्र जिल्ह्याचे सुपुत्र चंद्रशेखरजी घुले पाटील यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन पदाचा कार्यभार स्वीकारताच सहकारी पतसंस्थांशी चर्चा करून व्याजदर वाढीचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे जिल्ह्यातील संपूर्ण सहकारी चळवळीच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. चेअरमन चंद्रशेखर घुले पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने नुकताच ११ हजार कोटी रुपयांच्या ठेवींचा टप्पा गाठला असून ३१ मार्च २०२६ पर्यंत ठेवी १२ हजार कोटी रुपयांच्या पुढे जातील, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

दरम्यान, मुदत ठेवींवर घेतल्या जाणाऱ्या कर्जावरील व्याजदर पूर्वी २ टक्के होता. तो आता केवळ अर्धा टक्का करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जिल्हा मध्यवर्ती बँकेने घेतला आहे. तसेच सहकारी पतसंस्थांसाठी बँकेच्या बँकिंग विभागात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला असून या कक्षातून पतसंस्थांच्या अडचणींचे तातडीने निराकरण करण्यात येणार आहे.

‘सहकार अंतर्गत सहकार’ या तत्वानुसार सर्व सहकारी पतसंस्थांनी आपल्या ठेवी जिल्हा मध्यवर्ती बँकेतच ठेवाव्यात, असे आवाहन करण्यात आले. राष्ट्रीयकृत किंवा खाजगी बँकांमध्ये ठेवी ठेवल्यास मिळणाऱ्या व्याजावर आयकर कपात होते. मात्र अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत ठेवलेल्या ठेवींवरील व्याजावर आयकर भरावा लागत नसल्याने पतसंस्थांना अधिक आर्थिक लाभ होणार आहे, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभागृहात झालेल्या बँक व सहकारी पतसंस्था समन्वय बैठकीत बँकेने अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या दिशेने नवीन पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत जिल्ह्यातील सर्व सहकारी पतसंस्थांसाठी क्यू.आर. कोड सुविधा जिल्हा बँकेच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जाईल, अशी ग्वाही चेअरमन चंद्रशेखर घुले पाटील यांनी दिली.
या बैठकीस जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्हा.चेअरमन ॲड.माधवराव कानवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे उपस्थित होते. सहकारी पतसंस्थांची बाजू जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक मधुकरराव नवले, कडूभाऊ काळे, वासुदेव काळे, बँकेचे माजी कार्यकारी संचालक आर. डी. मंत्री, अकोले तालुका सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष भाऊ पाटील नवले तसेच नितीन चासकर यांनी मांडली.






